सिल्लोड: शिवसेना शिंदे गटाचे मराठवाड्यातील नेते आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले मी विधानसभेची पुढील निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. अंभई येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी सध्याच्या राजकारणातील जातीयवाद आणि धर्मवादावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
सत्तार म्हणाले, “मी आमदार-मंत्री असताना १८-१८ तास सालदार महिनदार सारखे काम केले. शासकीय योजनेचा लाभ अनेक महिलांना व कामगारांना मिळवून दिला, मतदारसंघाचा विकास केला, पण शेवटी जाती पातीवर निवडणूक झाली व माझा विजय २४२० मतांनी झाला.”
त्यांनी पुढे नमूद केले की, “लोकांना विकास नकोय, तर जाती पातीवर निवडणुका हव्यात. आगामी सिल्लोडची नगर परिषद माझी शेवटची निवडणूक राहील, मी यापुढे सिल्लोड विधानसभा निवडणूक लढणार नाही.”
सत्तार यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांच्या ठिकाणी संजय शिरसाट यांना संधी देण्यात आली, ज्यामुळे सत्तार आणि शिरसाट यांच्यात शाब्दिक चकमकही झाली होती.
सत्तार यांनी आपल्या मुलाला निवडणुकीत उतरण्याची मुभा दिली आहे, परंतु स्वतः निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सिल्लोड मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.