मुंबई, 9 मार्च 2025: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार उद्या, सोमवार 10 मार्च 2025 रोजी राज्याचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करणार आहेत. महायुती सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून, अजित पवार यांचा वित्तमंत्री म्हणून हा अकरावा अर्थसंकल्प असणार आहे.
जनकल्याण आणि विकासाचा समतोल राखणारा अर्थसंकल्प
अजित पवार हे आर्थिक शिस्तीचे कट्टर पुरस्कर्ते मानले जातात. त्यांनी आजपर्यंत सादर केलेले अर्थसंकल्प विकासाचा वेग कायम ठेवत लोकाभिमुख निर्णय देणारे ठरले आहेत. कोविड संकटाच्या काळातही त्यांनी महाराष्ट्राची आर्थिक घडी विस्कटू दिली नाही. त्यामुळे राज्याच्या आर्थिक व्यवस्थापनाबाबत त्यांचे राष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले होते.
गेल्या काही अर्थसंकल्पांत त्यांनी शेतकरी, कष्टकरी, महिला, आदिवासी, विद्यार्थी आणि युवक यांना केंद्रस्थानी ठेवून धोरणे जाहीर केली होती. यापूर्वी 2021 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून अर्थसंकल्प महिलांना समर्पित केला होता, तर 2022 मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ अर्थसंकल्प सादर केला होता.
उद्याच्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा
राज्यातील नागरिकांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. कृषी, उद्योग, दळणवळण, आरोग्य आणि मनुष्यबळ विकास यावर विशेष भर राहील, अशी शक्यता आहे. मागील वर्षी निवडणूकपूर्व अर्थसंकल्पातील लोकोपयोगी आणि जनहिताचे निर्णय महायुती सरकारला सत्तेत परत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यंदाचा अर्थसंकल्पही विकासाचा नवा रोडमॅप उभा करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अजित पवार विक्रमाच्या दिशेने
अजित पवार उद्या त्यांचा 11 वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात शेषराव वानखेडे यांनी सर्वाधिक 13 वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. उद्या अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अजित पवार सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मंत्र्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचतील.
सर्वाधिक अर्थसंकल्प सादर करणारे वित्त मंत्री:
1. शेषराव वानखेडे – 13 वेळा
2. अजित पवार – 11 वेळा (उद्याचा अर्थसंकल्प धरून)
3. जयंत पाटील – 10 वेळा
4. सुशीलकुमार शिंदे – 9 वेळा
राज्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचा ठरणारा हा अर्थसंकल्प विकास आणि आर्थिक शिस्त यांचा समतोल साधणारा असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.