बीड: जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून, पालकमंत्रीपदाबाबत मोठ्या चर्चा सुरू आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारावे, अशी मागणी केली आहे. आता पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून मंत्री धनंजय मुंडे यांचा पत्ता कट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः अजित पवार आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीवर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पालकमंत्रीपदाबाबत निर्णय हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल.” तसेच, बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी कठोर पावले उचलली जातील आणि कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात SIT स्थापन
संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. या हत्येच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी प्रशासनावर मोठी जबाबदारी आली आहे.
पालकमंत्रीपदाबाबत वाढती चर्चा
संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. भाजप नेते सुरेश धस यांच्या मागणीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव पालकमंत्रीपदासाठी पुढे आले आहे. यासोबतच, मुख्यमंत्री फडणवीस यांनाही या पदासाठी गटाच्या वतीने मागणी होत आहे.
सध्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय राज्य सरकारसाठी महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या पदावर नियुक्तीमुळे जिल्ह्यातील राजकीय स्थैर्य आणि कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. जिल्ह्यातील नागरिक आणि राजकीय पक्ष यावर लक्ष ठेवून आहेत.