छत्रपती संभाजीनगर: अजिंठा अर्बन बँक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसचे माजी आमदार सुभाष झांबड यांना पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. अखेर त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर केले जाणार आहे.

९७ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

अजिंठा अर्बन बँकेत 2006 ते 2023 या कालावधीत तब्बल 97 कोटी 41 लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष झांबड, तसेच बँकेचे सीईओ प्रदीप कुलकर्णी यांच्यासह इतर संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अटकेपासून झांबड फरार

राजकीय वर्तुळात प्रतिष्ठित मानले जाणारे माजी आमदार सुभाष झांबड यांच्यावर गुन्हा दाखल होताच ते अटकेच्या भीतीने फरार झाले होते. मात्र, शहरातील विविध ठिकाणी त्यांचे वावर दिसून येत होते. तरीही आर्थिक गुन्हे शाखेला त्यांना अटक करण्यात यश मिळाले नव्हते. अखेर आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून पुढील न्यायालयीन कारवाई सुरू आहे.

६० कोटींची रक्कम परत भरल्याचा दावा

अजिंठा बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सुभाष झांबड यांनी 60 कोटी रुपये भरल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. मात्र, उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी चौकशी सुरू आहे.

अनेक संचालकांविरोधात कारवाई सुरू

या प्रकरणात बँकेचे माजी चेअरमन, संचालक मंडळ आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. यात सुभाष माणकचंद झांबड, घेवरचंद मोतीलाल बोथरा, तनसुख माणकचंद झांबड, नवीनचंद संघवी, राजेंद्रसिंग जबिंदा, जितेंद्र मुथा, संजय फुलफगर, हरीश भिकचंद चिचाणी, सुशील बलदवा, महेश मन्साराम जसोरिया, सोपान तुळशीराम शेजवळ, उमेश डोंगरे, माणिक चव्हाण, रजनी देसरडा, माधुरी अग्रवाल, अनिल धर्माधिकारी, रवींद्र वाणी, संजय मिठालाल कांकरिया, शिरीष गादिया, दादासाहेब गंडे, नितीन रतनलाल मुगदिया, विद्या प्रफुल्ल बाफणा, कांचन श्रीमंतराव गोर्डे, अब्दुल पटणी, सुनील शंकरलाल सवईवाला, दिलीप हिराचंद कासलीवाल, बँकेचे सीईओ प्रदीप एकनाथ कुलकर्णी, मुख्य व्यवस्थापक संदेश भिवसन वाघ, शाखा व्यवस्थापक चेतन खुशालचंद गादिया आणि दीपाली देवेंद्र कुलकर्णी यांचा समावेश आहे.

Spread the love