बीड: जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला धमकी देण्यात आल्याचा एक धक्कादायक सीसीटीव्ही पुरावा समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून या प्रकरणावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे यांची जहरी टीका
मनोज जरांगे यांनी सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या आरोपींविषयी संताप व्यक्त केला आहे. “सीसीटीव्ही मधील दृश्ये धक्कादायक असून गुन्हेगारीच्या अशा घटनांनी राज्याची प्रतिमा मलिन केली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्या टोळीमुळे गुंडगिरी आणि हप्तेवसुलीच्या घटना वाढल्या आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला. “खंडणी मागण्यासाठी आणि खून करण्यासाठी संघटित कट रचला जात आहे, हे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे. हे सरकार संघटित गुन्हेगारीला पाठबळ देत आहे,” असा घणाघात त्यांनी केला.
कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
जरांगे यांनी या प्रकरणात सामील असलेल्या तीन टीमवरही निशाणा साधला. “खंडणी मागणारी टीम, खून करणारी टीम, आणि हे सर्व घडवणारे म्होरके… हे सर्व एकाच कटाचे भाग आहेत. सामूहिक कट रचणाऱ्यांना मुख्य आरोपी घोषित केले जावे,” अशी मागणी त्यांनी केली.
विष्णू चाटेचा फोन सापडत का नाही?
जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना जाहीर आवाहन करताना सांगितले की, “खंडणी आणि खून प्रकरणातील फरार आरोपी कोणाच्या संपर्कात होते, याचे कॉल डिटेल्स (सीडीआर) तपासून जाहीर केले जावेत. विष्णू चाटेने फोन फेकून दिला, तो अद्याप सापडत नाही, हा तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह आहे.”
संतोष देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका
सीसीटीव्ही पुराव्यामुळे आता आरोपींची जामीन मंजूर होऊ नये, अशी मागणी जरांगे यांनी केली. “सुटून आल्यावर आरोपी देशमुख कुटुंबाचा खून करू शकतात,” असा इशारा त्यांनी दिला. यासोबतच गृह विभाग आणि मंत्री वाल्मिक कराड यांच्यावरही गंभीर आरोप करत, “कराड यांच्या मालमत्तेमागे एका मंत्र्याचा संबंध आहे,” असा दावा त्यांनी केला.
पंकजा मुंडेंचा या प्रकरणाशी संबंध नाही
जरांगे यांनी स्पष्ट केले की, संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पंकजा मुंडेंचा कोणताही संबंध नाही. “मात्र, धनंजय मुंडे यांची टोळी आरोपींच्या बाजूने उभी राहत असून जातीवादाला खतपाणी घालत आहे,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
राज्यभर संतापाची लाट
संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण राज्य ढवळून निघाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमुळे आता खऱ्या आरोपींची ओळख पटली असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या घटनेने राज्य सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
(संपादक)
“हत्येप्रकरणाचा तपास जलद गतीने व्हावा आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी,” हीच सध्या राज्यभरातील जनतेची मागणी आहे.