मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळजनक दावा केला आहे. मंत्री धनंजय मुंडे हे बीडपुरते मर्यादित राहिले नाहीत, ते आता पुणे आणि संभाजीनगरमध्ये जमिनींच्या व्यवहारात गुंतले आहेत. मुंडे यांना जमिनीची एवढी भूक का लागली आहे, की सगळ्या जमिनी त्यांना हव्या आहेत?” अशी खोचक टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली.
वाल्मिक कराड आणि चौकशी अधिकाऱ्यांवर सवाल
आव्हाड यांनी पुढे सांगितले की, “वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हे दाखल असूनही, त्यांची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो माध्यमांमध्ये झळकले. एकाच अधिकाऱ्याला ९ वर्षे पदावर राहू देणे हे मुंडे यांच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाही.”
त्यांनी हेही नमूद केले की, “शिवलिंग मोराळे यांनी माध्यमांसमोर फालतू स्टोरी सादर केली. वाल्मिक कराड हा वंजारी समाजाचा प्रतिनिधी नाही. समाजाचा चेहरा म्हणून आरोपीला पुढे करणे अत्यंत धोकादायक आहे.”
जमिनीच्या तक्रारीचा उल्लेख
आव्हाड यांनी एका महिलेच्या प्रकरणाचा दाखला देत सांगितले की, “शेड्यूल कास्टच्या या महिलेची अडीच एकर जमीन राज धनवट यांनी बळकावली आहे. राज धनवट हे मंत्री धनंजय मुंडे यांचे जवळचे मित्र आहेत. यासंदर्भात तक्रार करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आला. संजय सिंघल या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी यासंबंधी चौकशीचे पत्र पाठवले होते, पण त्या चौकशीचे काय झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जातीय दंगलींची भीती व्यक्त
“एखाद्या आरोपीला जातीचा चेहरा लावणे गंभीर आहे. उद्या यामुळे जातीय दंगली होऊ शकतात,” असे मत आव्हाड यांनी व्यक्त केले.
धनंजय मुंडे यांची भूमिका काय?
या आरोपांवर मंत्री धनंजय मुंडे यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. परंतु, या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.