बीड; येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी चार्जशीट मध्ये बदल करण्यात आले आहेत का? असा थेट सवाल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी जेलमधील सुविधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत कराडला राजकीय पाठींब्यामुळे विशेष वागणूक मिळत असल्याचा आरोप केला आहे.
सीसीटीव्ही बंद, कराड व्हिडिओ कॉलवर!
अंजली दमानिया म्हणाल्या, “वाल्मिक कराड हा तुरुंगात असतानाही दोन-दोन तास व्हिडिओ कॉल करून बाहेरच्या लोकांशी संवाद साधत आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच जेल अधिकाऱ्यांनी एक पत्र काढून सांगितले की, ‘आमचे सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत.’ त्यामुळे नेमके काय चालले आहे?“
सामान्यांसाठी नियम, कराडसाठी सूट?
दमानिया यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले, “तुरुंगात कोणालाही प्रवेश मिळत आहे, चहा-नाश्ता दिला जात आहे. कोणीही वकीलाच्या नावाने येऊन कराडशी गप्पा मारत आहे. हे सामान्य कैद्यांसाठी शक्य आहे का?”
चार्जशीटमध्ये ‘सुटण्याची पळवाट’ तयार?
अंजली दमानियांनी ट्विटद्वारे चार्जशीटमधील काही मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित केले:
📌 टोळी प्रमुख सुदर्शन घुले?
चार्जशीटच्या पान 36 वर “टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले” असा उल्लेख आहे. दमानिया म्हणतात, “तो टोळी प्रमुख कसा? जर पुढील पानावर वाल्मिक कराड हा नंबर 1 आरोपी आहे, तर हे वाक्य काढले पाहिजे.”
📌 वाल्मिक कराडसाठी सोय?
चार्जशीट मध्ये “जो कोणी आड येईल त्याला अडवा करावा लागेल” असे कराडने सुदर्शन घुलेला सांगितल्याचा उल्लेख आहे. पण दमानिया म्हणतात, “त्याने कुठे स्पष्टपणे मारा असे सांगितलेले नाही. उद्या तो म्हणेल, ‘मी फक्त सूचना दिल्या होत्या.’ म्हणजेच ही त्याला सोडवण्यासाठी पळवाट आहे का?”
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी
या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप करत दमानियांनी मंत्री धनंजय मुंडे यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.